Friday, May 22, 2020

कवठे येमाई गावामध्ये कोरोना बाधीत रुग्ण संखेत एकाने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या झाली चार

कवठे येमाई ( पुणे ) : 
शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई गावात मुंबई मधून आजी आजोबांसोबत आलेल्या दुसऱ्या लहान मुलीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या चार झाली आहे.

     मुंबई मधून आपल्या कवठे येमाई या मुळ गावी आजी आजोबा  दोन नातींना घेऊन आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना गावात कॉरंटाईन केले गेले.परंतू कोरोना झाल्याने मुंबई या ठिकाणी त्यांचा मुलगा दवाखान्यात अॅडमिट होता. त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने या चार जणांची कोरोना टेस्ट केली तेव्हा आजी आजोबा व एक नात पॉझिटिव्ह आढळून आले होते. राहिलेल्या लहानग्या मुलीचाही अहवाल दि. २२ पॉझिटिव्ह आला असल्याचे समजले आहे. गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एकूण चार झाली असून हे सर्व रुग्ण पुण्यातील औंध येथील रुग्णालयात दाखल आहेत.

     कवठे येमाई गावात या रुग्णांच्या  संपर्कात आलेल्या तीन जणांना क्वारंटाईन केलेले असून आरोग्य विभागाचे त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष आहे.


Wednesday, May 20, 2020

मुंबई शहरातून शिरुर तालुक्यात आलेल्या आजी आजोबासह एका नातीला कोरोना.


कवठे येमाई (पुणे) :
     मुंबई शहरात स्थायिक असलेल्या कुंटुबाच्या जावयाने शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राजवळ सोडलेले आजी आजोबा व त्यांच्या दोन नाती, अशा चौघांपैकी तिघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

आजी आजोबा व त्यांच्या दोन नातींना (ता. आंबेगाव) साकोरे येथील जावयाने मुंबई मधून कवठे येमाई येथे आणून शुक्रवारी (ता. 15) ला पहाटे सोडले. या आजी आजोबांचे गाव कवठे येमाई आहे .ते गावात आलेवर आरोग्य उपकेंद्र आवारात झोपले होते.  वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी व डॉ. नामदेव पानगे यांना हे समजताच त्यांनी आरोग्य केंद्र सॅनिटाइझर करुन घेतले. आणि सबंधितांची आरोग्य  तपासणी करून सांस्कृतिक भवन या ठिकाणी त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
आजी आजोबांचा मुलगा मुंबईला कोरोना रुग्ण असून तो मृत पावल्याची बातमी डॉक्टरांना  समजल्या नंतर या चार जणांना पुणे (औंध) येथे तपासणीसाठी पाठविले होते.मंगळवारी (ता. 19) सकाळी चारपैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.पानगे यांनी दिली. यानंतर तालुका तहसीलदार, पोलिस निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी यांनी कवठे येमाई गावाला भेट देऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

तसेच कवठे येमाई गाव व सभोवतालचा परिसर सील केला आहे.


Sunday, May 3, 2020

मिरज शहरावर ड्रोनची नजर; घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार



कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरू असलेल्या काळात घोषित संचारबंदी झुगारून विनाकारण शहरभर फिरण्याची सवय लागलेल्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल स्वतः ड्रोन कॅमे-याद्रारे लक्ष ठेवून आहेत. कॅमेरा तीनेश साठ अंशात फिरत आहे. मिरज मार्केट येथून शहरातील दोन किलोमीटरचा परिसराची तो छायाचित्रे घेऊ शकतो.

मार्केटच्या मध्यभागापासून शहरातील दोन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर सुरू असलेल्या घडामोडी सध्या कॅमे-यांत चित्रीत केल्या जात आहेत.
ड्रोन कॅमे-याद्वारे शहरातील अनेक उपनगरातील प्रमुख चौकांचे छायाचित्र घेतली जात आहेत. आज केलेल्या ड्रोन टेहाळणीत रेवणी गल्ली, शास्त्री चौक, मिरज हायस्कूल रोड, नागोबा कट्टा, भारत नगर, शंभर फुटी, कमानवेस या उपनगरांत नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसले. गाडवे चौक, स्टेशन चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, दर्गा परिसर या परिसरात विनाकारण दुचाकी घेऊन फिरणा-यांची छायाचित्र संकलित झाली. आपर्टमेंट सोसायटीत राहणारे अनेक नागरिक अपार्टमेंटच्या गच्चीवर समुहाने थांबून दंगा मस्ती करताना आढळून आले.

सध्या संचारबंदीची अंमलबजावणी कडक असल्याने प्रमुख मार्गांवर फेरफटका मारणा-यांची संख्या कमी झाली असली तरी शहरातील उपनगरांत त्यांचे मोकाट फिरणे सुरूच असल्याचे शहरभर फिरलेल्या ड्रोन कॅमे-यात दिसून आले. त्यामुळे आता शहर पोलिसांकडून विनाकारण फिरताना दिसलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मोहिम सुरू झाली आहे. सोसायटीतील सदनिकांत राहत असलेल्या, विनाकारण सोसोयटीच्या छतावर येऊन दंगा मस्ती करणा-यांवर देखील कारावाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.